मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ' वादाचे पडसाद भारताच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे टॅरिफ बेकायदेशीर ठरवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. भारत-अमेरिका व्यापार करारात देशहिताशी तडजोड झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय
अमेरिकन सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ रद्द करताना म्हटले की, राष्ट्राध्यक्षांना अशा प्रकारे शुल्क लादण्याचा अधिकार नव्हता. मात्र, या निर्णयानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर 10 टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली. नव्या आदेशावर स्वाक्षरी करून जगभरातील देशांवर 10% ग्लोबल टॅरिफ लावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींचा पंतप्रधानांवर थेट हल्ला
या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, "पंतप्रधानांनी करार करून टाकला. त्यांची फसवणूक आता उघड झाली आहे. ते पुन्हा वाटाघाटी करू शकत नाहीत; केल्या तर पुन्हा शरणागतीच पत्करतील."
यापूर्वीही ट्रेड डीलवरून टीका
ट्रेड डील आणि टॅरिफच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी याआधीही सरकारवर अनेकदा टीका केली आहे. संसदेत तसेच सार्वजनिक मंचांवर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले होते. बजेट सत्रादरम्यानही या विषयावर जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि गदारोळ पाहायला मिळाला.
भारत-अमेरिका व्यापार करार
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत दीर्घकाळ चर्चा सुरू होती. विविध क्षेत्रांतील मतभेदांनंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीला सहमती झाली आणि 7 फेब्रुवारीला कराराची घोषणा करण्यात आली. करारानुसार, भारतीय कृषी उत्पादने अमेरिकेत शून्य टॅरिफवर निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अमेरिकन कृषी उत्पादकांना भारतात विशेष टॅरिफ सवलत देण्यात आलेली नाही. सरकारचा दावा आहे की, शेतकरी आणि दुग्धव्यवसायाच्या हितांशी कोणतीही तडजोड केलेली नाही.